प्रेषितांनी केलेले चमत्कार

healing 2

प्रेषितांनी केलेले चमत्कार

(डॉ. रंजन केळकर)

प्रभू येशूने त्याच्या बारा शिष्यांना सामर्थ्य व अधिकार देऊन देवाच्या राज्याची घोषणा करायला व आजारी असलेल्यांना बरे करायला पाठवले होते. त्याने त्यांना आज्ञा दिली होती की, “आजाऱ्यांना बरं करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा; तुम्हाला फुकट मिळालं आहे, फुकट द्या.” तेव्हा शिष्य निघाले आणि प्रत्येक ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत त्यांनी खेड्यांमधून प्रवास केला. (लूक ९:१-२,६, मत्तय १०:८)

येशूच्या स्वर्गारोहणानंतर येशूचे कार्य त्याच्या प्रेषितांनी पुढे चालू ठेवले. सर्वांत आधी पेत्र आणि योहान ह्यांनी केलेल्या एका चमत्काराचा उल्लेख ‘प्रेषितांची कृत्ये’ ह्या पुस्तकात आहे. पायांनी अधू असलेला एक माणूस यरुशलेमाच्या मंदिराबाहेरच्या वेशीजवळ भिक्षा मागत असे. पेत्र आणि योहान हे मंदिरात जात असताना त्याने त्यांच्याकडे भिक्षा मागितली. तेव्हा पेत्राने म्हटले, “माझ्याजवळ चांदी आणि सोनं काही नाही; पण माझ्याजवळ जे काही आहे ते मी तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावानं चाल.” हा चमत्कार पाहणारे लोक आश्चर्यचकित झाले. तेव्हा पेत्राने त्यांना समजावले की, त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने त्या माणसाला सुदृढ केले नाही, तर येशूच्या नावाने, त्याच्या नावावरील विश्वासाद्वारे, त्यांनी ते केले. (प्रे.कृ. ३:१-१६)

नंतरच्या काळात प्रेषितांच्या हातून पुष्कळ चिन्हे व अद्भुते होत गेली. लोद नावाच्या गावी ऐनियास नावाचा एक मनुष्य आठ वर्षे आपले अंथरूण धरून होता आणि पक्षघाताने आजारी होता. पेत्र त्याला म्हणाला, “ऐनियास, येशू ख्रिस्त तुला बरं करीत आहे; ऊठ, तुझं अंथरूण नीट कर.” आणि तो लगेच उठला. (प्रे.कृ. ९:३२-३४) लोदपासून जवळ असलेल्या यापो येथे टबिया नावाची एक शिष्या होती. ती आजारी पडून मरण पावली. पेत्राला तेथे बोलावले गेले आणि त्याने तिला जिवंत केले. (प्रे.कृ. ९:३६-४३)

प्रभू येशू म्हणाला होता की, “मी तुम्हाला सत्य सत्य सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तोपण मी करतो ती कामं करील. आणि ह्यांहून अधिक मोठ्या गोष्टी करील. माझ्या नावानं तुम्ही काही मागाल तर ते मी करीन. (योहान १४:१२-१४)

येशूच्या नावात मोठे सामर्थ्य आहे.

—————-

तुमची प्रतिक्रिया लिहा