येशूने सांगितलेले दाखले

येशूने सांगितलेले दाखले
(डॉ. रंजन केळकर)
स्तोत्र ७८:१-२ मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो,
“अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या,
माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा.
मी माझे तोंड उघडून दाखले सांगेन,
प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन.”
ह्या भविष्यवाणीची पूर्तता प्रभू येशू ख्रिस्तात झाली (मत्तय १३:३५).
जगाच्या स्थापनेपासून गुप्त ठेवलेल्या गोष्टी येशूने दाखले सांगून प्रकट केल्या. येशू लोकांपुढे बोलताना, त्याच्या शिष्यांना शिकवताना, तसेच कोणाचे व्यक्तिगत प्रश्न. सोडवताना, दाखले सांगत असे.
दाखला म्हणजे एक प्रकारची कथा. पण केवळ मनोरंजनासाठी सांगितलेली ती गोष्ट नाही, किंवा नुसती बोधकथाही नाही. दाखला सुरू होतो तो एका सामान्य गोष्टीसारखाच. पण तो पुढे एक निराळेच वळण घेतो. कथानकातील एका पात्राविषयी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. श्रोता त्या प्रश्नाचे सहजपणे उत्तर देऊन टाकतो, त्या व्यक्तीचा न्याय करतो. पण नंतर श्रोत्याला वाटू लागते की, कदाचित ती व्यक्ती त्याचेच प्रतिरूप तर नाही? त्याने नकळत स्वतःचाच न्याय तर नाही केला?
येशूने सांगितलेले दाखले त्या काळच्या सामाजिक परिस्थितीशी व चालीरीतींशी संबंधित होते. पण आजच्या काळाशीसुद्धा ते विसंगत वाटत नाहीत. आजदेखील ते आपल्या अंतःकरणाला छेडतात, आपल्या विचारांना चालना देतात. आपला जीवनक्रम आपण बदलायला हवा असे आपल्याला वाटू लागते. स्वर्गाचे राज्य, पापांची क्षमा, देवाची प्रीती, विश्वास, पैशाचा लोभ, दुसऱ्यांबरोबर आपले आचरण अशा विविध विषयांवरील येशूने सांगितलेले दाखले वाचायला खाली क्लिक करा:
कृपादान

कृपादान
(डॉ. रंजन केळकर)
हल्ली काही टी. व्ही. चॅनलवर एक दृश्य पुष्कळदा बघायला मिळते. शेकडो लोक एखाद्या सभागृहात बसलेले असतात. त्यांच्यांतले काही लोक रांगेत उभे असतात. त्यांनी आधी नोंदणी शुल्क भरलेले असते. सर्वांचा प्रश्न एकच असतो की, कृपा कशी मिळवता येईल. कृपा कुठे तरी अडकलेली असते आणि तिचा मार्ग खुला करण्याचे उपाय त्यांना सांगण्यात येतात.
पण पवित्र शास्त्र पुन्हा पुन्हा सांगते की, कृपा ही माणसाला कमावता येत नाही. तसे करणे जर शक्य झाले, तर कृपा ही कृपा राहणारच नाही (रोम ११:६).
देवाच्या महान कृपेविषयी आपल्याला नव्या करारात पानोपानी वाचायला मिळते. ग्रीक नव्या करारात charis व charin हे दोन शब्द शंभराहून अधिक वेळा आढळतात. मराठीत त्यांचा अर्थ कृपा असा आहे.
कृपा कोणाला विकत घेता येत नाही, कारण ती देवाचे दान आहे (इफिस २:८). देव स्वतःहून प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे कृपादान देतो (इफिस ४:७).
देवाची कृपा आपल्यात कार्य करीत असते. आपण जे काही आहोत, ते देवाच्या कृपेमुळे आहोत (१ करिंथ १५:१०). कोणत्याही परिस्थितीत देवाची कृपा आपल्याला पुरेशी असते. आपल्या दुबळेपणात ती आपल्याला शक्ती देते (२ करिंथ १२:९).
आपले तारण देवाच्या कृपेमुळे आणि आपल्या विश्वासाने होते, आपल्या कृतींमुळे नाही (इफिस २:५, २:८, तीत २:११).
आपण देवाच्या कृपेमुळे नीतिमान ठरवले जातो, म्हणून आपल्याला सनातन जीवनाची आशा आहे (तीत ३:७).
कृपेच्या राजासनापुढे आपण केव्हाही धैर्याने जाऊ शकतो आणि तेथे आपल्याला दया आणि कृपा निश्चितपणे मिळतात (इब्री ४:१६).
आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत आणि ज्ञानात आपण वाढत गेले पाहिजे. त्याला आता व सर्वकाळ गौरव असो. आमेन. (२ पेत्र ३:१८)
—————————-
महाबळेश्वर दर्शन

महाबळेश्वर दर्शन
(डॉ. रंजन केळकर)
महाबळेश्वरला एक धावती भेट देण्याची मला नुकतीच संधी मिळाली. आणि मला तेथे माझ्या आजोबांची आठवण आली. त्यांना मी कधी पाहिले नव्हते, पण त्यांचे लिखाण मी वाचलेले आहे.
माझे आजोबा, हरी गोविंद केळकर, ह्यांचा जन्म अलिबागच्या एका हिंदू कुटुंबात झाला. १८८१ साली, वयाच्या विसाव्या वर्षी, त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. १८८९ मध्ये ते काही काळ महाबळेश्वरला जाऊन राहिले होते. “महाबळेश्वर येथें पाहण्यांत येणार्या कित्येक गोष्टी” ह्या शीर्षकाचा त्यांचा एक लेख ज्ञानोदय मासिकाच्या ३० मे १८८९ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. तो मी मागे कधी वाचला होता पण पुण्याला परतल्यावर तो मी पुन्हा एकदा वाचला.
१८८९च्या त्या लेखात हरी गोविंद केळकर म्हणतात,
“येथें पर्वताला निरनिराळीं टोंकें आहेत. त्यांनाही इंग्रजींत निरनिराळीं नांवें आहेत. एका टोंकापासून दुसरें टोंक जवळ दिसतें, पण मध्यें खोरें असल्यामुळें डोंगराच्या कडेकडेनें तिकडे जाण्यास बराच हेलपाटा घ्यावा लागतो. अशा एखाद्या टोंकावर संध्याकाळीं उभें राहून सूर्यास्त पाहण्यास फार मजा वाटते. संपूर्ण सूर्यबिंब आकाशांत दिसतें, व त्याजकडे पाहून डोळे मुळींच दिपत नाहींत. तेथें उभें राहून डोंगर, खोरीं, निरनिराळीं झाडें, डोंगरास लागून जाणारीं धुकीं, अंगास लागणारा मंदमंद शीतल वायू, त्यावर आरूढ होऊन येणारे पुष्पगंध इत्यादि प्रकार पाहून मनास मोठा आल्हाद प्राप्त होतो, व ईश्वराचा थोरपणा व आपलें लघुत्व लक्षांत येऊन असें वाटतें कीं, ईश्वरानें आम्हां मानवांकरितां या सृष्टींत काय काय चमत्कार उत्पन्न करून ठेवले आहेत तरी आम्ही त्याची सेवा योग्य प्रकारें करीत नाहीं हा आमचा किती कृतघ्नपणा होय.”
१८८९च्या तुलनेने आजचे महाबळेश्वर किती निराळे आहे! आता हजारो पर्यटक निसर्गाचे सौंदर्य बघायला, त्याची मजा लुटायला, महाबळेश्वरला जात असतात. पण निसर्गाचे ते सुंदर रूप पाहताना, ज्याने निसर्गाला आणि आपल्याला निर्माण केले त्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या उत्पन्नकर्त्याची आपण थोडीशी आठवण केली, तर किती छान होईल ना!
महाबळेश्वरला मी घेतलेल्या दोन छायाचित्रांचे मी वॉलपेपर बनवले. ते डाउनलोड करायला खाली दिलेल्या थंबनेलवर क्लिक करा.
———————–
सनातन जीवन

सनातन जीवन
(डॉ. रंजन केळकर)
पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन ही ख्रिस्ती विचारधारेची मुलभूत तत्त्वे आहेत. मरण म्हणजे जीवनाचा अंत नाही, पण परमेश्वराच्या निरंतर सान्निध्यात सनातन जीवनाचा प्रारंभ आहे. प्रभू येशूने सांगितलेली सुवार्ता हीच आहे.
नव्या कराराच्या सुरुवातीच्या चार पुस्तकांना ‘शुभवर्तमान’ म्हणण्यात येते कारण त्यांत येशूच्या जीवनकथेपेक्षा किंवा त्याच्या शिकवणीपेक्षा त्याच्या सुवार्तेवर अधिक भर दिलेला आहे. संत योहानाच्या शुभवर्तमानात पुन्हा पुन्हा सनातन जीवनाविषयी आपल्याला वाचायला मिळते. येशूने वेगवेगळ्या संदर्भांत, निरनिराळ्या प्रकारे, सनातन जीवनाविषयी काय सांगितले हे योहानाने आपल्यासाठी लिहून ठेवले आहे.
सर्वांत महत्वाचे म्हणजे, परमेश्वराने प्रत्येक माणसासाठी सनातन जीवन देऊ केले असले तरी ते मिळवण्यासाठी विश्वास आवश्यक आहे. स्वतः प्रभू येशूने अनेक वेळा हे सत्य सांगितले आहे की, जो विश्वास ठेवतो त्याला सनातन जीवन मिळेल. (योहान ३:१५, ३:३६, ६:४७)
दुसरे हे की, ज्याला सनातन जीवन मिळते त्याचा नाश होणार नाही. शेवटच्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. सर्व जगाचा न्याय होईल तेव्हा तो न्यायात येणार नाही. तो मरणातून जीवनात गेला आहे. (योहान ३:१६, ५:२४, ६:२७, ६:५४)
प्रभू येशूने हे स्पष्ट केले की, मनुष्यांना सनातन जीवन देण्याचा अधिकार त्याला दिलेला आहे. तो म्हणाला की, “माझी मेंढरं माझी हाक ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागं येतात. आणि मी त्यांना सनातन जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.” तो म्हणाला की, शास्त्रलेख त्याच्याविषयी साक्ष देतात. एकदा येशूने त्याच्या बारा शिष्यांना विचारले की, जसे दुसरे काही लोक त्याला सोडून गेले तशी त्यांचीही त्याला सोडून जायची इच्छा आहे का? त्यावर शिमोन पेत्राने येशूलाच प्रश्न केला की, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? तुझ्याजवळ सनातन जीवनाची वचनं आहेत.” (योहान ५:३९, ६:६७-६८, १०:२७-२८, १७:२)
जो एकच खरा देव आणि त्याने पाठवलेला त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला आपण ओळखावे हे सनातन जीवन आहे. (योहान १७:३)
योहान सांगतो की, त्याने जे शुभवर्तमान लिहिले ते ह्यासाठी की, “येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे.” (योहान २०:३१)
———————
हेल्पलाइन
हेल्पलाइन
(डॉ. रंजन केळकर)
“मे आय हेल्प यू?”, “तुम्हाला मदत पाहिजे आहे काय?” अशा प्रकारचे फलक रेल्वे स्थानकांवर, रुग्णालयांत, सरकारी कचेऱ्यांत असतात. पुष्कळदा तेथे मदत द्यायला कोणीच नसते किंवा मदत नीट मिळत नाही. कधी तेथे खूप गर्दी असते आणि आपल्याला थांबायला वेळ नसतो. टेलिफोन हेल्पलाइनची परिस्थिती फारशी निराळी नाही. तिचा क्रमांक फिरवला तर तो पुष्कळदा व्यस्त असतो. नाही तर आपली व्यथा ऐकणारे लोक व्यस्त असतात आणि आपण प्रतीक्षा करावी असे सांगण्यात येते.
आता कल्पना करा की, आपण मदतीसाठी कोणाकडे धाव घ्यायच्याऐवजी मदत आपल्याकडे धावून आली तर? कल्पना करा की, प्रत्यक्ष देवाचा पुत्र आपल्याकडे येऊन आपल्याला विचारत आहे की, “तुम्हाला मदत पाहिजे आहे का?” पण ही फक्त कल्पना नाही. ती वस्तुस्थिती आहे. स्वतः प्रभू येशूने हा प्रश्न विचारल्याची अनेक उदाहरणे नव्या करारात वाचायला मिळतात.
दोन अंधळे रस्त्याच्या कडेला बसलेले असतात. येशू त्या वाटेने चालला आहे असे त्यांना कळते पण तो त्यांना दिसत नाही, म्हणून ते नुसतेच ओरडतात. येशू त्यांना जवळ बोलावून घेतो आणि स्वतः त्यांना विचारतो, “तुमच्यासाठी मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे?” आणि तो त्यांना दृष्टी देतो. (मत्तय २०:२९-३४)
एक स्त्री अठरा वर्षे आजारी असते. तिला सरळ उभेदेखील राहता येत नसते, मग ती येशूची मदत कशी मागणार? पण येशू तिला बघतो तेव्हा तो स्वतः तिला म्हणतो, “बाई, तू आपल्या व्याधीपासून मुक्त झाली आहेस.” (लूक १३:१०-१३)
तसाच दुसरा एक मनुष्य अडतीस वर्षांपासून आजारी असतो आणि एका जागी पडलेला असतो. त्याची असहाय्य अवस्था बघून येशू त्याला विचारतो, “तुला बरं व्हायची इच्छा आहे काय?” आणि तो त्याला बरे करतो. (योहान ५:१-९)
एकदा एक मोठा अधिकारी येशूकडे येतो आणि त्याला फक्त सांगतो की, त्याचा एक सेवक खूप आजारी आहे. येशू त्याला काहीही विचारत नाही पण लगेच म्हणतो, “चला, मी आताच तुमच्या घरी येतो.” (मत्तय ८:५-१३)
मोठ्या व्यक्तींची भेट घेणे किती अवघड असते हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांच्या दरवाजाबाहेर आपण उभे राहतो आणि विचारतो, “मे आय कम इन?” पुष्कळदा आपल्याला लगेच आत जाता येत नाही, बाहेर बराच वेळ वाट पहावी लागते. कधी कधी त्यांची भेट होतच नाही. आता कल्पना करा की, आपण घरी बसलो आहोत आणि ती मोठी व्यक्ती आपल्याला भेटायला आली आहे! पण हीसुद्धा कल्पना नाही, तर वस्तुस्थिती आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, “मी दाराशी उभा आहे आणि ठोकीत आहे. कोणी मनुष्य जर माझा आवाज ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याकडे आत येईन.” (प्रकटी ३:२०)
आपली कहाणी, आपली व्यथा, आपले दुःख, ऐकून घ्यायला प्रभू येशू सदोदित तयार आहे. तो आपल्या अंतःकरणाच्या दाराशी उभा आहे. आजच्या युगात येशू आपली हेल्पलाइन आहे, जी २४ x ७ खुली असते आणि कधी व्यस्त नसते.
———————–



वाचकांच्या प्रतिक्रिया